प्रतिनिधी मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वानखेडे स्टेडियमला भेट दिली. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीदरम्यान, मुंबईत जागतिक दर्जाच्या क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या प्रसंगी उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड, सचिव डॉ. उन्मेश खानविलकर, संयुक्त सचिव निलेश भोसले आणि अपेक्स कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते. वानखेडे स्टेडियम हे भारतीय क्रिकेटचे महत्त्वाचे केंद्र असून, आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी येथील सोयी-सुविधा आणि तयारीचा आढावा या मान्यवरांनी घेतला.
मुंबईतील क्रिकेटप्रेमींना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आणि मैदानाची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर कायम राखण्यासाठी एमसीए प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या भेटीमुळे क्रिकेट वर्तुळात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.






