प्रतिनिधी मुंबई: राज्याच्या राजकारणातील ‘पॉवरफुल’ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या शिरपेचात आता मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या क्रीडा मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, हे महत्त्वाचे खाते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द केले आहे. विशेष म्हणजे, आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या अजितदादांकडे प्रथमच क्रीडा विभागाची धुरा आली आहे.
दादांची प्रशासनातील अनुभवी मंत्री म्हणून ओळख
अजितदादा पवार हे त्यांच्या शिस्तीसाठी, वेळेच्या पालनासाठी आणि धडाडीच्या निर्णयांसाठी ओळखले जातात. प्रशासनावर त्यांची असलेली पकड सर्वश्रुत आहे. आतापर्यंत त्यांनी अर्थ, नियोजन, जलसंपदा अशा ‘हेवीवेट’ खात्यांमध्ये आपली चुणूक दाखवली आहे. मात्र, क्रीडा क्षेत्राशी त्यांचा तसा जुना संबंध आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे
त्यांना खेळाडूंच्या अडीअडचणींची जाण आहे. आता अधिकृतपणे ‘क्रीडा मंत्री म्हणून ते काय नवीन व नाविन्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माणिकराव कोकाटे यांनी तडकाफडकी दिलेल्या
राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मात्र, त्यांच्या रिक्त जागी अजितदादांसारख्या अनुभवी नेत्याची वर्णी लागल्याने क्रीडा विभागाला आता एक नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात सन 2026 मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा, खेळाडूंचे मानधन आणि राज्यातील क्रीडा संकुलांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादा आपल्या अनुभव वापरून नवीन निर्णयांची गरज असल्याचे बोलले जात आहे.
खेळाडूंना नवे क्रीडामंत्री यांच्या कडून मोठ्या अपेक्षा
अजितदादांकडे सध्या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजे अर्थमंत्री पद त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे कीडा मंत्री आणि अर्थमंत्री एकाच व्यक्तीमध्ये असल्याने क्रीडा क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी आशा खेळाडूंमध्ये व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या खेळपट्टीवर चौकार-षटकार मारणाऱ्या अजितदादांनी क्रीडा मंत्रालयाची ही नवी खेळी स्वीकारली आहे. त्यांच्या या नवीन मंत्रीपद ग्रहण केल्यामुळे महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला सुवर्णदिवस येतील काय, हे येणारा काळच ठरवेल, पण सध्या तरी, क्रीडा विश्वात दादा आले, आता जिंकणारच! असा सूर उमटत आहे.






