Homeक्रीडानागपूर विद्यापीठाने पाच नव्या क्रीडा प्रकारांचे समावेश करण्याकरिता क्रीडा संचालकांना निवेदन

नागपूर विद्यापीठाने पाच नव्या क्रीडा प्रकारांचे समावेश करण्याकरिता क्रीडा संचालकांना निवेदन

प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे विविध नवीन खेळांच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात यावे, या मागणीसाठी विविध क्रीडा संघटनांच्या वतीने विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. संभाजी भोंसले यांना नुकतेच एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले.

अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी तयारी

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी द्वारा अधिकृतरित्या अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये फ्लोअर बॉल, वूशू, ग्रिकोरोमन कुस्ती, स्केटिंग आणि आस्टेडू आखाडा अशा विविध खेळांना मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे

सक्षम संघ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पाठवता यावेत, या उद्देशाने विद्यापीठ स्तरावर आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे. या स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.

विविध क्रीडा संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा

तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक अवसरे आणि शहर कुस्तीगीर संघ नागपूरचे सचिव डॉ. पियुष आंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात नागपूर जिल्हा आष्टेडू आखाडा संघाचे सचिव किरण यादव, श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेकचे डॉ. विवेक शाहू, शहर कुस्तीगीर संघाचे सहसचिव संदीप खरे, जिल्हा फ्लोअर बॉल संघाच्या सचिव शुभांगी मॅडम, वुशू संघाचे पदाधिकारी शेख जावेद आणि उमरेड तालुका कुस्ती संघाचे सचिव अमोल रायपुरकर यांचा समावेश होता.

नागपूर विद्यापीठ क्रीडा संचालकांचे सकारात्मक आश्वासन

यावेळी शिष्टमंडळाने विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. संभाजी भोंसले यांच्याशी विस्तारपूर्वक चर्चा केली. चर्चेदरम्यान, क्रीडा संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, फ्लोअर बॉल, वूशू, कुस्ती, स्केटिंग आणि आस्टेडू आखाडा या खेळांच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा लवकरच घेण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, खेळाडूंना आता अधिकृत व्यासपीठ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular